पुण्यात मेट्रो सुरू झाली…. विस्तार कधी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । पुण्यातील मेट्रो सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी डिसेंबर 2016 मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर, सध्याच्या महापालिकेचा पाच वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी सहा मार्च 2022 मध्ये पंतप्रधानांच्या हस्तेच मेट्रो रेल्वे धावण्याचा प्रारंभ करण्यात आला. पुढील वर्षात मेट्रो दोन्ही मार्गावरून धावू लागल्यानंतर गतिमान सार्वजनिक वाहतुकीचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होईल.

महापालिकेचा मेट्रो प्रकल्प उभारणीत थेट संबंध नसला, तरी या प्रकल्पाची आखणी व पाठपुरावा महापालिकेनेच गेल्या दोन दशकांत केला. त्याला मूर्त स्वरूप गेल्या पाच वर्षांत आले. महापालिकेने त्यासाठी निधी दिला, तसेच काही जागाही दिली. मेट्रोला जोडणारी फिडर सर्व्हिस सुरू होत आहे. त्यामध्ये पीएमपी बससेवाही वापरली जाईल. या नियोजनामुळे सार्वजनिक वाहतूक आपोआपच गतिमान होणार आहे.

पाच स्थानके भूमिगत
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांंना जोडणारी मेट्रो असली, तरी पूर्व- पश्चिम जोडणारा वनाज ते रामवाडी हा 15.7 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग पूर्णपणे पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका भवन या 17.5 किलोमीटर मार्गापैकी सहा किलोमीटर मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. स्वारगेट ते शिवाजीनगरदरम्यानची पाच स्थानके भूमिगत आहेत.

भूमिगत मार्ग सहा किलोमीटरचा आहे. तेथून खडकीतून उन्नतमार्गाने मेट्रो पिंपरी चिंचवडकडे पौड रस्ता आणि कर्वे रस्ता यावरील वनाज कंपनीपासून गरवारे महाविद्यालयादरम्यानची मेट्रो सध्या धावू लागली आहे. ती जेव्हा महापालिका भवन आणि त्यानंतर पुढे नगर रस्त्याने मार्गस्थ होईल, त्यावेळी खर्‍या अर्थाने प्रवाशांच्या उपयोगी ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी शहराच्या मध्यवर्ती भागात ये-जा करणार्‍या पुणेकरांना ती सोयीची ठरेल. कोरोना साथीच्या लॉकडाऊन काही महिने कामावर परिणाम झाला. 2023 च्या मध्यापर्यंत हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोच्या हालचाली सुरू आहेत. सध्या नदीपात्रातील मेट्रो मार्गावरील कामे सुरू असली, तरी पावसाळ्यात त्याला मर्यादा येतील.

कामाला मिळाली गती
मेट्रोच्या कामांनी पुणे शहरात 2018 मध्ये गती पकडली. 2019 च्या डिसेंबरपासून 2020 मध्ये भुयारी मार्ग खणण्याला प्रारंभ झाला. येत्या चार-पाच महिन्यांत मेट्रो ये-जा करण्याचे दोन्ही भुयारी मार्ग खणून पूर्ण होतील. त्यानंतर तेथील मेट्रो मार्ग व स्थानके बांधण्याला वेग येईल. नगररस्त्यावरील कामाला थोडी उशिरा सुरुवात झाली. तो उन्नतमार्ग असल्याने, त्याला पुढे गती प्राप्त झाली. तेथील बहुतांश खांब बांधले आहेत. आता पूल बांधण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षात गरवारे महाविद्यालयापर्यंत पोहोचलेली मेट्रो हळूहळू नगररस्त्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. पुणे महापालिकेच्या हद्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर येथील न्यायालय या दरम्यानच्या 23 किलोमीटर मार्गावरील पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार्‍या मेट्रोचे कामही लवकरच सुरू होईल. तीन-चार वर्षांत ती मेट्रोही सुरू होईल. पंतप्रधान मोदी यांचे हस्ते या मेट्रोचेही भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले. प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम गेल्या तीन वर्षांत पूर्ण झाले.

सार्वजनिक वाहतुकीबरोबरच प्रदुषणाचा प्रश्न सुटेल
महामेट्रोचे दोन्ही मार्ग 33 किलोमीटरचे आहेत. भविष्यात मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रोने महापालिकेच्या सूचनेनुसार आराखडा करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट व पुढे हडपसरपर्यंतचे वीस किलोमीटरचे अंतर, तसेच हडपसर ते खराडी (5 किमी), रामवाडी ते वाघोली (12 किमी), एसएनडीटी ते वारजे (8 किमी), वनाज ते चांदणी चौक (1.5 किमी), याबरोबरच महापालिकेने एससीएमआरटी हा 36 किमीचा मार्गाचा अहवाल तयार केल्यानंतर एकूण 82.5 किमी मार्गाचा अहवाल पुढे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार होत गेल्यास पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गतिमान होत जाईल. पीएमपी, एसटी, रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीची जोड त्याला मिळेल. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यावर पुण्यातील वाहतूक कोंडी व प्रदूषणाची समस्या काही प्रमाणात सुटेल.

मेट्रो मार्ग 2
दोन्ही मार्गाचे अंतर ………………. 33.2 कि.मी.
स्थानके …………………………………… 30
दैनंदिन अपेक्षित प्रवासी संख्या ………….6 लाख
अपेक्षित खर्च ………….14 हजार कोटी रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *