महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । जागतिक पातळीवर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ होत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झालेले असतानाच, भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा ही दोन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. शनिवारी रात्री अरुणाचाल प्रदेश अॅक्टिव्ह केसेसपासून मुक्त झाले तर त्रिपुरा आठवडाभरापूर्वीचे कोरोनामुक्त झाले आहे. याचबरोबर शनिवारी आसाममध्ये देखील कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आढळले नाहीत. ईशान्येकडील राज्यात मागील दहा दिवसांमध्ये एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही.
याबाबत अरुणाचल प्रदेशचे आरोग्य सचिव पी पार्थिबन म्हणाले की, सीमावर्ती राज्यात प्रदीर्घ तिसरी लाट संपवणे हे एक आव्हान होते. जेथे अॅक्टिव्ह रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मैलांचा प्रवास करावा लागला. गेल्या डिसेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेपासून, आमच्याकडे आता शून्य अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे. एप्रिल २०२० पासून अरुणाचल प्रदेशमध्ये ६४,४८४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. केवळ १७ लाख लोकसंख्या असलेल्या राज्यात, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही संख्या चिंतेची बाब असल्याचे सांगितले.
अरुणाचल प्रदेश आरोग्य सेवा संचालनालयाच्या ताज्या अपडेटनुसार, ६४ हजार १८८ बाधित कोरोनामुक्त बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २९६ कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्रिपुराने जानेवारीपासून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यासाठी कठोर उपायांचा अवलंब करून कोरोनामुक्त होण्याचा मार्ग दाखवला होता. त्रिपुरातील आगरतळा विमानतळावर, वैध RT-PCR अहवाल तयार केल्यानंतरही, सर्व येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.