थोडक्यात हुकला भारताचा ऑस्कर पुरस्कार, ‘या’ माहितीपटाला मिळाला पुरस्कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । ऑस्कर पुरस्काराला कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखले जाते. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. हा सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. पण त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे.

भारतातून एका माहितीपटाला ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत नामांकन मिळाले होते. ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारमध्ये नामांकन मिळाले होते. ‘रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट आहे. यापूर्वी या माहितीपटाला सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे दोन पुरस्कारही मिळाल्यामुळे अनेक भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

पण द समर ऑफ सोलने सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरल्यामुळे ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला अपयश आले. ‘रायटिंग विथ फायर’सोबतच ‘असेंशन’, ‘एटिका’, ‘फ्ली’ या माहितीपटांनाही नामांकन मिळाले होते.

दरम्यान दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘खबर लहरिया’ वृत्तपत्रावर ‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट प्रकाश टाकतो. २००२ मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओने बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. ‘रायटिंग विथ फायर’मध्ये ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या माहितीपटात मीरा आणि तिच्या सहकाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पुरुषप्रधान संस्कृती विरोधात आवाज उठवतात, पोलीस दलाची अक्षमता तपासतात आणि जात, लैंगिक अत्याचार पीडितांबाबत लिहितात.

‘रायटिंग विथ फायर’चा या अगोदर २०२१मध्ये सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. या माहितीपटाने या फेस्टिव्हलमध्ये ‘द ऑडियन्स अवॉर्ड’ आणि ‘स्पेशल ज्यूरी अवॉर्ड’ जिंकले होते. आतापर्यंत २० पेक्षा जास्त आंतराष्ट्रीय पुरस्कार या माहितीपटाने जिंकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *