Silver Rate: चांदी होणार लाखाची ! साडेतीन हजारांनी उसळी, दर नव्वद हजारांपार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। सोन्याचे दर सातत्याने वधारत असताना, चांदीने अचानक उसळी घेत दराचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (दि. १७) रात्री चांदी तब्बल साडेतीन हजारांनी वधारल्याने आजवरचे विक्रम मोडीत निघाले. चांदी ९० हजार १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली असून, लवकरच ती लाखाचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने सातत्याने वधारत आहे. गेल्या दिवाळीत ६१ ते ६२ हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने मार्चपर्यंत स्थिर होते. ४ मार्चपासून सोन्याच्या दरात तेजी आली. गेल्या दीड महिन्यात सोने तब्बल बारा ते चौदा हजार रुपयांनी वधारले. शनिवारी (दि. १८ मे) ते ७७ हजार ७०० रुपये होते. सोन्यासह गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या दरातही अचानक तेजी आली आहे. गेल्या वर्षभरापासून चांदी ६५ ते ७५ हजार रुपये प्रतिकिलोवर स्थिर होती. गेल्या महिन्यात गुढीपाडव्यादरम्यान ती ७९ हजार रुपयांवर होती. त्यानंतर हळूहळू वाढत जाऊन ती ८७ हजारांपर्यंत गेली. मात्र, शुक्रवारी (दि. १७) रात्री तिने अचानक उसळी घेत ९० हजारांचा टप्पा ओलांडला. हा आजवरच्या इतिहासातील विक्रमी दर आहे.

इलेक्ट्रिक उद्योगात अनेक उत्पादनांत चांदीचा वापर वाढला असून, वाहनांसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टरमध्येही ती वापरली जाते. त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेही सोने-चांदी वधारत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टीने मागणी
दर वाढूनही शुद्ध सोने व चांदीची वेढी, बिस्किटे, नाणी यांना मागणी कायम आहे. कारण, लोक सोन्या-चांदीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांत लोकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा अधिक फायदा सोने-चांदीच्या गुंतवणुकीतून झाला आहे, असे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *