महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.
देशात 04 जून 2022 ते 10 जून 2022 या दरम्यान 40 हजार 888 रुग्ण होते. हा आकडा 11 जून 2022 ते 17 जून 2022 या दरम्यान 70 हजार 358 वर पोहोचला. यामुळे आधीच्या आठवड्याच्या तुलनेत गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 72 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशातील सवार्धिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात 23 हजार 153 रुग्ण होते, त्याआधीच्या आठवड्यात रुग्णांची संख्या 14 हजार 363 होती. राज्यातील रुग्ण संख्येत आठवड्याभरात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाबाधितांमध्ये 136 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 04 जून 2022 ते 10 जून 2022 या दरम्यान 3 हजार 286 रुग्ण होते. हा आकडा 11 जून 2022 ते 17 जून 2022 या दरम्यान रुग्णांची संख्या 7 हजार 757 वर पोहोचली.