महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । भाजप-शिंदेसेना सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षादेश (व्हीप) मोडून विरोधी बाजूने मतदान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका शिंदे गटाचे शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी अध्यक्षांकडे केली आहे. यामध्ये अजय चौधरी, सुनील प्रभू, डॉ. राहुल पाटील यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मात्र, एकनाथ शिंदे गटाने मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली. रविवारी (३ जुलै) गोगावले यांनी अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानुसार विधिमंडळ सचिवालयाने पत्र काढून अजय चौधरी यांना गटनेते तर सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोदपदावरून हटवले. त्यानंतर सोमवारी याविरोधात सेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र, कोर्टाने आता सर्व सुनावणी ११ जुलै रोजीच होईल, असे सांगितले. त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरली.
१६ आमदारांबाबत पुढे काय
सोमवारी गोगावलेंनी १६ आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. अध्यक्ष आता आदित्य ठाकरेंसह संबंधित आमदारांना नोटीस बजावतील. त्यानंतर व्हीप झुगारणाऱ्या आमदारांचे अध्यक्ष म्हणणे ऐकून घेतील. व्हीप मोडल्याचे अध्यक्षांना वाटल्यास ते पुढे आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.