२०० जागा जिंकल्या नाहीत तर……… ; पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडून शेतावर जाईल, असा निर्धार व्यक्त करतानाच शिवसेना, हिंदुत्व वाचविण्यासाठी, शिवसैनिकांसाठी आपण उठाव केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, जे घडले ते एका दिवसात घडलेले नाही. एकीकडे पक्षाकडून मला चर्चा करा म्हणत होते, दुसरीकडे मला पक्षनेतेपदावरून काढून टाकले. मुख्यमंत्रिपदासाठी मी उठाव केला नाही. आमच्यासोबतच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. भाजपसोबत चला असे मी उद्धवजींना पाचवेळा सांगितले. पण मला अपयश आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारा पक्ष (काँग्रेस) आमच्यासोबत होता, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो, असे ते म्हणाले.

माझ्या घरावर दगड मारणारा पैदा झाला नाही
आमदारांच्या घरावर दगडफेक केली गेली. त्यांचे पुतळे जाळण्यास सांगितले. तीस-पस्तीस वर्षे रक्ताचे पाणी आम्ही ज्या पक्षात केले त्यांनी आमचे खच्चीकरण केले. पण एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, तरी आम्ही संयम ठेवला. पण संयमाची परीक्षा घेऊ नका, असे आव्हान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिले. वयाच्या सतराव्या वषी शिवसैनिक झाल्यापासूनचा प्रवास सांगताना त्यांनी, अंगावर घेतलेल्या केसेस, ठाण्यातील सोळा लेडीज बार उद्ध्वस्त केल्याची घटना, ठार मारण्याचे झालेले प्रयत्न अशा घटनांचाही उल्लेख केला.

महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असे नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितले असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडेही बोट दाखविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *