गद्दारांचं विकृत हसू, निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू यातून नक्की मार्ग काढणार : उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी काल जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली होती. आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेना भवन येथे बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत बंड करणाऱ्या नेत्यांचं नाव न घेता टीका केली. आज मी एका ठिकाणी उभा एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातील विकृत हसू आणि निष्ठावतांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी या सर्वामधून नक्कीच मार्ग काढणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना पक्षाची धुरा ज्यांच्यावर सोपवली त्यांनीच पाठीत वार केला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड करणाऱ्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गद्दार असा उल्लेख केला आहे. काल शंभर टक्के बांधव होते, आज शंभर टक्के भगिनी आहेत. आज मला शक्ती मिळाल्याचा अनुभव आला. तुम्ही सर्व जणी अमाप कष्ट करता, तुमच्या डोळ्यामध्ये मला अश्रू दिसत आहेत. गद्दारांच्या डोळ्यात विकृत हसू आणि निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू आहेत. या सर्वांमधून मी मार्ग काढणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर घडलं आहे. २५ ते ३० वर्ष आपल्या सोबत राहिले ते कट्टर शत्रू झाले आहेत. २५-३० वर्ष ज्यांच्यासोबत लढलो (काँग्रेस राष्ट्रवादी) , जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली का सरकार स्थापन केलं हे देखील माहित आहे, सातत्याने सांगितलं जायचं काँग्रेस पाहा काय करेल, राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या कपाळावर तर शिक्काच आहे, पण ते सोबत राहिले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्याकडे बघत असताना ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली त्यांनीच पाठीत वार केला, ही सर्वात लाजीरवाणी आणि शरमेची गोष्ट आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेऊ नका सांगितलं होतं ते अजूनही सोबत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *