Janmashtami 2022: श्रीकृष्ण जयंती ; ‘असे’ करा गोकुळाष्टमीचे व्रत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी यंदा गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाणार आहे. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. (Krishna Janmashtami Dates 2022)

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥… श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. सन २०२२ मधील श्रीकृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी कधी आहे? या दिवशी व्रताचरण कसे करावे?

श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ: गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे.

श्रावण वद्य अष्टमी समाप्ती: शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ १० वाजून ५८ मिनिटे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव: १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ १२ वाजता.

‘असे’ करा गोकुळाष्टमीचे व्रत

जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. (Shri Krishna Jayanti Vrat Puja Vidhi)

व्रताची सांगता कशी करावी?

जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *