महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत पहिल्यांदा बंड करुन बाहेर पडलेल्या आणि अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या १६ आमदारांचं भवितव्य, शिवसेनेवर कोणाचा हक्क राहणार यासारख्या प्रश्नांची उत्तर या निकालामधून मिळणार आहेत. मात्र आजच्या निकालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो मुख्यमंत्री शिंदे हे पात्र ठरणार की अपात्र. बंडखोरीनंतर शिंदेंसहीत बंड करुन बाहेर पडणाऱ्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली. याविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरही आजच सुनावणी होणार आहे. त्यामुळेच शिंदेच अपात्र ठरले तर सरकार कोसळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल असं मत व्यक्त केलं आहे.
काँग्रेस म्हणते, “…तर राष्ट्रपती राजवट”
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. चुकीचं घडत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून त्या पद्धतीचा निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे तसं झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते,” असं थोरात म्हणाले.
राष्ट्रवादीचं म्हणणं काय?
पिंपरी चिंडवडमधील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात मत व्यक्त केलं. “देशात न्याय असेल तर आमचा विजय होईल. देशात न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर दहाव्या सुचीप्रमाणे अपात्रतेच्या नियमांनुसार ज्यांनी पक्षाच्या व्हिपच्याविरोधात मतदान केलं आहे. ते अपात्र ठरलं हे नैसर्गिक आहे,” असं पाटील यांनी म्हटलं.
“न्याय द्यायचा नसेल तर तो लांबणीवर टाकणं हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तो लांबवणीवरही टाकला जाऊ शकतो. आम्हालाही उत्सुकता आहे या देशातील सर्वोच्च न्यायालय कसं वागतंय. त्यांनी जी कारवाई केली त्यावरुन या देशातील जनतेचा या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार की नाही याचाही निर्णय त्याबरोबर होईल,” असंही पाटील यांनी म्हटलं.
मध्यवर्ती निवडणुकींची शक्यता वाटते का?
पाटील यांना मध्यवर्ती निवडणुकींची शक्यता वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. “राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर निर्णय दिला. तर हे ४० जण किंवा पहिले १६ जण अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल. कारण त्या पहिल्या १६ मध्ये एकनाथ शिंदेंचं नाव आहे. त्यामुळे ते अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. मग नवा पर्याय हा एक किंवा राष्ट्रपती राजवट लागू करुन मध्यवर्ती निवडणुका घेणं दुसरा पर्याय,” असं पाटील यांनी म्हटलं.