महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणे ते औरंगाबाद या शहरातील अंतर आता दोन तासांत कापता येणार आहे, असा सुखद दिलासा गडकरींनी दिला आहे. येत्या वर्षभरात मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे पूर्ण होईल त्यानंतर पुणे- औरंगाबाद प्रवासही जलद होणार आहे.
नितीन गडकरी यांच्या हस्ते सातारा-सांगली जिल्ह्यातील २३०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन शुक्रवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात उंडवडी कडेपठार ते फलटण या ३३.६५ किमी लांबीच्या चौपदरीकरणाची पायाभरणी तर, सांगलीत त्यांनी सांगली ते पेठ नाका या ४० किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन गडकरींच्या हस्ते पार पडले.
औरंगाबाद ते पुणे दरम्यान सुमारे २२५ किमी अंतराचा हा प्रवेश नियंत्रित एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे. हा रस्ता तयार झाल्यावर अवघ्या दोन तासात औरंगाबाद ते पुणे प्रवास शक्य होईल, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. दरम्यान, पुणे-औरंगाबाद एक्स्प्रेस वे मार्गावर पाथर्डीसह अन्य तालुक्यांतून हा मार्ग जात आहे, असंही म्हटलं जातंय.
नितीन गडकरींनी महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या महामार्गांबद्दलही माहिती दिली आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूरमधून जाणारा नवीन मुंबई-बेंगळुरू महामार्ग पूर्ण झाला आहे. भूसंपादन पूर्ण झाले काम सुरू झाले आहे. तसंच, मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग पुढील वर्षी वापरासाठी खुला होणार आहे. उद्योगांसाठी महामार्गालगतच्या जागा विकासित करण्यासाठी काही योजना आखण्यात याव्या यासाठी मी महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांशी संवाद साधणार असून यातून लाखो नोकऱ्या निर्माण होतील, असं गडकरींनी म्हटलं आहे.