राज्याची चिंता वाढली! विचित्र साथीचं थैमान, गांभीर्याने घ्या ही लक्षणं; वाचा व्हायरसवरील उपाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । नाशिककरांना गेल्या काही महिन्यांपासून विचित्र ‘व्हायरल इन्फेक्शन’ला सामोरे जावे लागत आहे. आठवडाभराहून अधिक दिवस ताप राहणे, खोकलाही १५ दिवसांत कमी न होण्यासारख्या समस्या बहुसंख्य कुटुंबांतील किमान एका व्यक्तीला तरी सतावत असल्याने ही विचित्र साथ शहरवासीयांसाठी तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे.

बदलत्या हवामानातच शहरभरात विचित्र साथीचा प्रसार होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून खासगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. ऑडिनो आणि एच३एन२ या व्हायरसची लक्षणे बहुतांश रुग्णांत आढळत असून, अशा प्रत्येकाने कटाक्षाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून व्हायरल आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच वातावरणात सातत्याने ऊन, थंडी, पाऊस असे बदल होत असल्याने या तक्रारींत अधिक भर पडली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विचित्र ‘व्हायरल इन्फेक्शन’चा सामना सर्वच वयोगटातील नागरिकांना करावा लागत आहे. अन्य व्हायरल आजारांत ताप चार-पाच दिवसांत कमी होतो. परंतु, आठ ते दहा दिवस उपचार घेऊनही ताप कमी होत नसल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये अशा तक्रारी अधिक असून, त्यामुळे पालकांचीही चिंता वाढली आहे. दोन आठवडे खोकला न थांबणे, आठवडाभर ताप कमी न होणे, पोटात दुखणे, जुलाब होणे, चक्कर येणे, प्रचंड अशक्तपणा जाणवणे यांसारख्या तक्रारी घेऊन दवाखान्यांत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अँटिबायोटिक्स देऊनही अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती डॉक्टर्स देत आहेत.

तापात झटका येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, जेवण कमी होणे, खोकताना दम लागणे, शौचास काळी होणे, शौचाचा वास अत्यंत उग्र असणे, चक्कर येऊन पडणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. लांबत जाणाऱ्या अशा तीव्र लक्षणांमुळे काही रुग्णांची प्रकृती खालावत असून, त्यांना रुग्णालयांतही दाखल करावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *