High BP: ‘या’ चुकांमुळे कमी वयातच होतो रक्तदाबाचा आजार ; लक्षणे दिसताच त्वरीत सावध व्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०७ मार्च । जेव्हा रक्तदाब 120/80 mmHgची पातळी ओलांडते तेव्हा ते शरीराला जास्त धोका निर्माण होतो. रक्तदाबाचा आजार म्हातारपणात होतो असे लोकांना वाटते. पण बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि सवयी यांमुळे आता कोणत्याही वयोगटाच्या लोकांना हे गंभीर आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे.

उच्च रक्तदाबाच्या आजारासाठी वय जबाबदार नसल्याचं अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. चुकीचा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वाढणारा हा आजार नियंत्रणात न राहिल्यास हृदय, किडनी आणि मेंदूला इजा होऊ शकते.

उच्च रक्तदाबाच्या आजारामुळे ब्रेन स्ट्रोक होतो. जर रक्तदाब बराच काळ सतत उच्च राहिल्यास त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात.

उच्च रक्तदाबामुळे छातीत दुखणे, चक्कर येणे, चेहरा लाल होणे, धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, अस्पष्ट दृष्टी, लघवीतून रक्त येणे, थकवा, तणाव, हृदयाचे वाढलेले ठोके, डोकेदुखी आणि नाक वाहणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, उच्च रक्तदाबाच्या समस्येसाठी आपले वय नाही, तर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी जबाबदार आहेत. कमी वयातच उच्च रक्तदाबाचा आजार होण्यामागे कोणती कारणे जबाबदार असू शकतात ते जाणून घेऊया.

रक्तदाब वाढण्यासाठी मिठाचे अतिरिक्त सेवन कारणीभूत ठरू शकते. सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील रक्तदाबाची पातळी वाढते. शरीराला कार्य करण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते, परंतु त्याचे प्रमाण वाढल्यास ते धोकादायक ठरू शकते.

मिठाचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण त्याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आपण एका दिवसाला पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

धूम्रपान आरोग्यासाठी अपायकारक आहे. पण धूम्रपान करणे जितके हानिकारक आहे तितकेच धूम्रपान करणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात येणेदेखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. तंबाखूच्या घातक धुरामुळे आरोग्याला हानी पोहोचते.

चांगल्या आरोग्यासाठी निरोगी बॉडी मास इंडेक्स आवश्यक आहे. अनेकांना त्यांच्या वजनाची चिंता नसते. लठ्ठपणामुळे रक्तदाबाचा आजार तर होतोच पण त्यामुळे रक्तातील साखरही वाढते.

मधुमेह असलेल्या व्यक्तीला उच्च रक्तदाब होण्याची शक्यता चार पटीने जास्त असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराशी संबंधित गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता वाढते.

जॉन्स हॉपकिन्स मेडिसिन वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अहवालानुसार, मधुमेह असलेल्या प्रौढांपैकी सुमारे दोन तृतीयांश लोकांचा रक्तदाब 130/80 mmHg पेक्षा जास्त असतो.

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *