महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मार्च । गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज अखेर संपली. दोन्ही गटांच्या वकिलांनी राज्यघटनेतील तरतुदी व जुन्या निकालांचे दाखले देत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आता शिंदे गटाच्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचा काय निकाल लागेल, यावर सारे अवलंबून राहणार आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद संपल्यानंतर घटनापीठाने निर्णय राखून ठेवला.
गेल्या २३ ऑगस्टला हा खटला पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. कृष्ण मुरारी व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने घेतला. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी घटनापीठापुढे सुरू आहे. घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याशिवाय न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.