काळजी घ्या ; राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मार्च । कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत.

या सहा राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश
महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निर्देश दिले. चाचणी, पाठपुरावा, उपचार, मास्क, लसीकरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. रूग्णसंख्या अधिक असलेले भाग शोधून तिथे आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात 668 कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा असं आवाहन करण्यात आले आहे.

H3N2 इन्फ्लूएन्झाचा अलर्ट
राज्यासह मुंबईत H3N2 या इन्फ्लूएन्झाचे तसंच कोरोनाचेही रूग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. खासगी रूग्णालयांना इन्फ्लूएन्झा अलर्ट देण्यात आलाय. बेड तयार ठेवण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेने दिलेत. एकीकडे H3N2 वाढत असतानाच कोरोना रूग्णसंख्याही वाढत असल्याने मनपा चिंतेत आहे.

इन्फ्लूएन्झा आणि कोरोनाती लक्षणे सारखीच
इन्फ्लूएन्झा आणि कोरोनामध्ये सर्दी, खोकला, तापासह बहुतांश लक्षणं सारखीच आहेत. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, गर्दीत जाणं टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, जास्त दिवस लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या मध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून 2 टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

– काल राज्यात 87 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 79,89,703 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.16 टक्के एवढे झाले आहे.
– आज राज्यात 226 नवीन रुग्णांचे निदान
– राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,65,28,298 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,39,055 (09.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *