उन्हाळा आग ओकणार ; देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ एप्रिल । वायव्य भारतातील काही भाग व द्वीपकल्पीय प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले. या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातील बहुतांश भागांत कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे, असेही आयएमडीने म्हटले. मुंबईतही उन्हाने आपला कडाका दाखवायला सुरुवात केल्याने लाेक पूर्ण ‘बंदाेबस्तासह’ घराबाहेर पडताना दिसत आहेत.

कोणती राज्ये उकडून निघणार?

– बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरयाणाचे काही भाग उष्णतेने उकडून निघतील.

– तेथे उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या लक्षणीयरीत्या अधिक राहिल, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.

– उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात २ ते ४ दिवसांची उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

एल निनो अद्याप नाही?

सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर न्यूट्रल एन्सोची स्थिती आहे. विषुववृत्तीय मध्य पॅसिफिक महासागरात आगामी हंगामात काही उबदार वातावरणासह समुद्राचे तापमान सामान्य असणे
अपेक्षित आहे.

एप्रिलमध्ये पावसाची शक्यता

-आयएमडीच्या मते १९०१ मध्ये तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून भारतात २०२३ मधील फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण राहिला.
– मात्र, सात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (वायव्य भारतातील हवामान बदल) प्रभावाने सामान्य पातळीहून अधिक पाऊस झाल्याने मार्चमध्ये तापमानावर अंकुश राहिला.
– एप्रिलमध्येही सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.

एप्रिल ते जून या कालावधीत मध्य भारत, पूर्व आणि वायव्य भारताच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असतानाच आता मुंबई शहर आणि उपनगर देखील तापू लागले आहे. शनिवारी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला. प्रखर सूर्यकिरणे मुंबईकरांना तापदायक ठरत आहेत. उकड्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *