भाजपच्या ‘बी’ प्लॅनने शिंदेसेना अस्वस्थ; शिरसाट, केसरकरांनी भाजपला करून दिली ‘युती धर्मा’ची आठवण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेची टांगती तलवार असून ९ महिन्यांतच आपले महत्त्व संपून भाजपकडून अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेण्याची संभाव्य रणनीती, या सर्व घडामोडींमुळे शिंदे गट अस्वस्थ आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपला इशारा दिला. ‘राष्ट्रवादी सोडून अजित पवार भाजपत आले तर त्यांचे स्वागतच, मात्र भाजपने राष्ट्रवादीशी युती केल्यास मात्र आम्ही सत्तेतून बाहेर पडू,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यापूर्वी खासदार गजानन कीर्तिकर व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यानीही सत्तेसाठी भाजपला आमचीच गरज असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

आमदार अपात्र ठरल्यास भाजपच्या दृष्टीने महत्त्व संपणार

सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवले तर भाजपच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व संपून जाईल. शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल व सत्तापक्ष अल्पमतात येईल. अशा परिस्थितीत भाजप मध्यावधीच्या विचारात नाही. किमान वर्षभर तरी सरकार टिकवायचे असेल तर भाजपला संख्याबळ वाढवण्यासाठी नवा मित्रपक्ष शोधावा लागेल. यादृष्टीने अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा एक गट गळाला लावण्याचा प्लॅन आखल्याची चर्चा सुरू आहे.

ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यासोबत जायचे कसे : शिंदे गटाला प्रश्न

अजित पवारांकडून निधीबाबत अडवणूक, शिवसेना पक्ष खिळखिळा करण्याचे राष्ट्रवादीचे षड‌्यंत्र अशी कारणे देऊनच शिंदे गटाने ठाकरेंशी काडीमोड घेतला. आता तेच अजित पवार किंवा राष्ट्रवादी पक्षासोबत सत्तेत कसे एकत्र यायचे?
शिवसेेनेत उभी फूट पाडून भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण केले. त्याची बक्षिसी म्हणून भाजपने ४० आमदार पाठीशी असतानाही शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले. मात्र त्यांच्यासोबत आलेल्या अनेक आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता पुन्हा सत्तेत राष्ट्रवादी वाटेकरी झाल्यास शेवटच्या वर्षभरातही मंत्रिपद मिळण्याच्या आशेवर पाणी सोडावे लागेल.
भाजपसोबत राष्ट्रवादीचा गटही सत्तेत प्रभावी होईल. स्वत: शिंदे पदावर नसल्यास त्यांच्या गटाचे महत्त्व कमी होईल. परिणामी समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन ते ठाकरे गटाकडे पुन्हा जाण्याची भीती.
बंडाच्या वेळी सोबत आलेले १० अपक्ष आमदारही पद व निधी न मिळाल्यास साथ सोडण्याची शक्यता.

शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ‘पार्थ पवारांचा लोकसभेला पराभव झाल्यापासून अजितदादा नाराज आहेत. ठाकरे सरकारमध्येही त्यांना दुय्यम स्थान दिले होते. मविआच्या नागपूर सभेतही त्यांना बोलू दिले नाही. म्हणून दादा अस्वस्थ आहेत. ते आमच्यासोबत आल्यास आमच्या ताकदीवर काहीही परिणाम होणार नाही. पण त्यांचा निर्णय अजून झालेला नाही. ठाकरे सरकारमध्ये असताना अजितदादांनी आमच्या आमदारावर अन्याय केल्याच्या मतावर आम्ही ठाम आहोत. पण ते ‘वरिष्ठांच्या आदेशा’नुसार तेव्हा हे करत होते. आता ते आमची विचारधारा स्वीकारून सोबत येत असल्यास त्यांचे स्वागतच आहे. पण राष्ट्रवादी म्हणून सोबत आल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने येईल, असा विश्वास आहे. त्यामुळे त्याचा व अजित पवारांच्या प्रवेशाचा काहीही संबंध नाही, असे शिरसाट म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *