MSEDCL : महावितरणकडून ग्राहकांवर आर्थिक ओझ्यांवर ओझे लादण्याचा प्रकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । वाढलेले जीवनावश्यक वस्तुंचे दर, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, शिक्षण व आरोग्यावरील खर्च आदींमुळे सामान्य माणसाचे पुरते कंबरडे मोडले आहे. याच महिन्यात महावितरणने वीज दरवाढ करून ग्राहकांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. आता त्यात महावितरणने अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या स्वरुपात महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव आम्ही का भरायची? असा सवाल ग्राहकांकडून होत आहे.

आधीच देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज सर्वात महाग आहे. तरीही महावितरणने ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीची भरपाई करण्यासाठी वीज दरवाढ करण्याच्या मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी)कडे केला होता. यावर्षी एप्रिल महिन्याच्या १ तारखेपासूनच वीज दरवाढ लागू झाली.

मे महिन्यापासून मोठा आर्थिक फटका बसणे सुरू होणार आहे. राज्यात सरासरी २१ टक्क्यांच्यावर वीज दरवाढ करण्यात आली असल्याचे ग्राहक संघटनेचे म्हणणे आहे.

एवढी प्रचंड वीज दरवाढ ग्राहकांवर लादली असतानाही महावितरण अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावावर पुन्हा ग्राहकांकडून पैसे लुबाडण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यापूर्वी सुरक्षा ठेवीची रक्कम एका महिन्याच्या बिलाइतकी होती. मात्र, नवीन नियमांनुसार एप्रिल २०२२ पासून ती दुप्पट म्हणजे दोन महिन्यांच्या बिलाइतकी करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरण ग्राहकांवर आर्थिक ओझ्यांवर ओझे लादण्याचा प्रकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *