महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ मे । आज शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोल्याला भेट दिली. तिथे त्यांनी बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. बाबुराव गायकवाड हे काँग्रेस एसपासून शरद पवार यांचे सहकारी राहिले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन आमदार शहाजीबापू आणि दीपक साळुंखे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं आहे. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित असल्यानं हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात शहाजीबापू आणि शरद पवार शेजारी-शेजारीच बसले आहेत. यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं की, ज्या निवडणुकीत बाबुराव माझ्या गाडीत बसले, तेव्हाच गुलाल माझ्या अंगावर पडला. लोकसभेच्या निवडणुकीत पवारसाहेब सांगतील तेच आम्ही करायचो, पण विधानसभा आली की आम्ही आमच्या रस्त्याने जायचो. पवार साहेब मी स्वतः ला तुमचा मुलगाच मानतो, सांगोला आणि बारामतीचं एक वेगळ नातं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी वेगळ्या पक्षात असल्याने संयोजकांना वाटत होतं की मी या कार्यक्रमाला येईल की नाही, पण मी त्या कार्यकर्त्याला म्हणालो , अरे तुझी साहेबांशी आत्ता ओळख झाली असेल. पण साहेबांमागे पळून, पळून माझ्या टाचा घासल्यात. आज 10 वर्षांनी मला पवार साहेबांचं जवळून दर्शन झालं हे माझं भाग्य असल्याचं यावेळी शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.