महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मे । आजपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांची घरवापसी सुरु आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी 19 मे रोजी या नोटा परत घेण्याची घोषणा केली. ज्यांच्याकडे या नोटा मोठ्या प्रमाणावर घरात साठवलेल्या होत्या, त्यांनी लागलीच या पेट्रोल पंप, दारुची दुकाने आणि सराफा बाजाराकडे मोर्चा वळविला. काहींनी ऑनलाईन शॉपिंग रोखीत केली. सराफा बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडल्याने दुकानदारांनी कमाईची आयती संधी सोडली नाही. गुलाबी नोटा असतील तर त्यावर कमिशन घेतले. त्यामुळे सोने-चांदी (Gold Silver Price) महागात पडली. ताज्या भावापेक्षा अशा ग्राहकांना नोटा खपविण्यासाठी अधिक पैसा द्यावा लागला. अर्थात ही दरवाढ कृत्रिम आहे.
गेल्या पंधरवाड्यापासून सोने-चांदीन नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोने-चांदीच्या धरसोड वृत्तीने बाजारात भावांचा ताळमेळ राहिला नाही. सलगा तीन-चार दिवस भावात घसरण दिसते आणि अचानक भावात एक-दोन दिवस तेजीत असतात. सकाळच्या सत्रात स्वस्त असणारे मौल्यवान धातू संध्याकाळी पुन्हा महागतात, असा मामला सुरु आहे. त्यामुळे खरेदीदारांना भावाचा नेमका अंदाज बांधता येत नसल्याचे चित्र आहे.