दुसरी क्वालिफायर आज; मुंबईचा धडाका रोखण्याचे गुजरातपुढे आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ मे । यंदाच्या आयपीएलमध्ये अडखळत सुरुवात केलेल्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या टप्प्यात आपल्या लौकिकानुसार धडाकेबाज खेळ करत प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आणि नंतर लखनौ सुपरजायंटस्विरुद्ध दणदणीत विजय मिळवत दिमाखात दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेशही केला. आता अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने मुंबई संघ शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार असून, यासाठी त्यांना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध भिडावे लागेल.

या लढतीत मुंबईकरांचे लक्ष असेल ते वेगवान गोलंदाज आकाश मढवालकडे. लखनौविरुद्ध केवळ ५ धावांत ५ बळी घेत त्याने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला होता.

 जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती, त्यानंतर जोफ्रा आर्चरचे अपयश आणि नंतर दुखापतीमुळे त्याने घेतलेली माघार यामुळे मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणावर अनेकांनी शंका उपस्थित केली. परंतु, मोक्याच्या वेळी मुंबईकर गोलंदाजांनी आपली ताकद दाखवून देताना मुंबई इंडियन्स चॅम्पियन संघ का आहे, हे दाखवून दिले.

मुंबई इंडियन्स
 रोहित शर्माचे चतुर नेतृत्व मुंबईसाठी निर्णायक ठरेल.
 कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड आणि तिलक वर्मा ही मधली फळी बहरली तर मुंबईला रोखणे कठीण.
 गोलंदाजीत आकाश मढवाल, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ यांच्यावर मोठी मदार
 डेथ ओव्हर्समध्ये मुंबईकरांना जबाबदारीने मारा करावा लागेल.

गुजरात टायटन्स
 शुभमन गिल प्रमुख फलंदाज असून, त्याला इतर फलंदाजांकडून पुरेपूर साथ मिळणे गरजेचे.
 हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा यांना फलंदाजीत छाप पाडावीच लागेल.
 गोलंदाजीत चांगले पर्याय आहेत. राशिद खान मुख्य ताकद असून मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद यांचाही मारा महत्त्वाचा ठरेल.
 विजय शंकर, राहुल तेवटिया यांची फटकेबाजी निर्णायक ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *