महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । आरटीई शाळा प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना 29 मेपासून प्रवेशासंबंधी एसएमएस पाठविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत ऑनलाइन प्रवेश निश्चित करायचा असून शाळा अलॉटमेंट पत्र तसेच अत्यावश्यक कागदपत्रे घेऊन पडताळणी समितीकडून कागदपत्रे पडताळणी करून घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविल्या जाणाऱया 25 टक्के कोटा प्रवेशातील नियमित प्रवेश फेरीनुसार राज्यातील 64 हजार 256 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना शाळेतील रिक्त जागेनुसार प्रवेश देण्यात येत आहेत.
– नियमित प्रवेश फेरीसाठी 94 हजार 700 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील 64 हजार 256 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. n पुणे जिह्यात 15 हजार 501 विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 10 हजार 752 विद्यार्थ्यांना नियमित फेरीतून प्रवेश मिळाला. n मुंबई विभागातून 18 हजार 226 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 हजार 372 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.
25 हजार 890 विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रतीक्षा यादीतील 25 हजार 890 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्यात पुणे जिह्यात सर्वाधिक 4 हजार 492 विद्यार्थी असून मुंबई जिह्यात 1 हजार 745, नागपूर 2 हजार 17, नाशिक 1 हजार 368, संभाजीनगर 1 हजार 320, तर ठाणे जिह्यात 2 हजार 975 विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून प्रवेश मिळाला आहे. यातील 206 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागातील प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 355 विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या शाळेत, तर 410 विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे.