केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, आता प्रत्येक ट्रकमध्ये AC बसवणं बंधनकारक, कारण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । देशातील ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. नितीन गडकरींनी हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन उद्योगाला या नियमानुसार बदल करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ आवश्यक आहे. रस्ते, वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा २०१६ मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला होता.

“देशात काही चालक १२ ते १४ तास गाडी चालवतात”
नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात काही चालक १२ ते १४ तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या देशात चालक ४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानात गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो.”

“मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक”
“मी जेव्हा मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक होतो. मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असं म्हणत याला विरोध केला. मात्र, आज (१९ जून) मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.

ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार
नितीन गडकरी यांच्या या निर्णयानंतर भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत १२ ते १४ तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

दरम्यान, वॉल्व्हो सारख्या ट्रक उत्पादक जागतिक कंपन्या आधीपासून आपल्या ट्रकमध्ये एसी केबिन उपलब्ध करून देतात. आता भारतातील कंपन्यांनाही २०२५ पासून प्रत्येक ट्रकमध्ये एसी केबिन देणं बंधनकारक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *