चीनला जशास तसे उत्तर द्या , मोदी सरकारचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ :- पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. त्याचबरोबर चीनबरोबर सुरु असलेला वाद अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात तणाव असल्यामुळे भारत यापुढे चीनपासून नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी वेगळी रणनीती आखणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. आज संरक्षण मंत्रालयाची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशी बैठक पार पडली. या बैठकीला सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बिपीन रावत यांच्यासहित तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी रविवारी भेट घेतली. सोमवारी राजनाथ सिंग रशिया दौऱ्यावर जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. राजनाथ सिंग यांना यावेळी लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर सर्व प्रमुखांना नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

चीनकडून जर पुन्हा नियंत्रण रेषेवर पुन्हा आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे पूर्ण अधिकार भारतीय लष्कराला देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर सुत्रांकडून मिळाली आहे. चीनने पूर्व लडाख किंवा इतर ठिकाणी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

१५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेले गलवाण खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही पहिलीच घटना आहे. या दोन्ही १९९३ मध्ये अण्वस्त्रधारी देशांनी केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. या कराराबाबत गलवाण खोऱ्यातील घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.

माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी याबाबत सांगितलं की, सैन्यमाघारीची प्रक्रिया जर जलद गतीने पार पडली नाही, तर गलवाणमधील घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. समोरासमोर उभे ठाकलेल्या सैनिकांमध्ये तणाव, संतापाची भावना अधिक असते. एखादी लहानशी घटनाही संघर्षांची ठिणगी टाकण्यासाठी पुरेशी ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *