Pune Accident : अपघात झाल्यानंतर विशाल अगरवाल यांचे या आमदाराला ४५ मिस्डकॉल्स ; फोन रेकॉर्डवरून धक्कादायक माहिती समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मे ।। Pune Porsched Car Accident Update : पुणे पोर्श अपघात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केल्याचं तपासातून उघड झालं आहे. १९ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अगरवाल आणि टिंगरे यांच्यात एकूण ४५ मिस्डकॉल्स होते. पुणे टाईम्स मिररने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अपघात घडल्यानंतर विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केला. आमदार टिंगरे झोपेत असल्याने त्यांनी सुरुवातीला फोन उचलला नाही. पहाटे ३.४५ पर्यंत विशाल अगरवाल यांनी टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला. परंतु, ४६ व्या कॉलला त्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर ते लागलीच सकाळी ६ वाजता ते येरवडा पोलीस ठाण्यात अगरवाल यांच्या मदतीसाठी पोहोचले. पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही आमदार टिंगरे स्पष्टपणे दिसत आहेत.

“अगरवाल कुटुंब, पोलिस अधिकारी आणि आमदार टिंगरे यांच्यातील संवादाची नोंद झाली आहे”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीकवरून पुणे टाईम्स मिरलला दिली. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक तपशील किंवा संभाषणाचे तपशील देण्यास नकार दिला. विशाल अगरवाल हे आमदार टिंगरे यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. तसंच, ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती, असं सुनील टिंगरे यांनीही स्पष्ट केलं होतं.

अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून टिंगरे यांचं नाव या अपघातात घेतलं जात होतं. परंतु, आपण अगरवाल कुटुंबाला वाचवण्याकरता नाही तर या अपघात प्रकरणी न्याय मिळण्याकरता प्रयत्न करत असल्याचा खुलासा टिंगरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, आता टिंगरे, अगरवाल कुटुंब आणि ससूनचे सामान्य रुग्णालयाचे डॉ.अजय तावरे यांच्यातील संबंध समोर आले आहेत.

टिंगरे यांच्याविरोधात मतदारसंघात रोष
आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधातील रोष आता वाढू लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. टिंगरे यांच्या उपस्थितीत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला. तसंच, मृत अनीश अवधियाचे काका ग्यांद्र सोनी यांनी रुग्णवाहिका व्यवस्था आणि इतर कायदेशीर औपचारिकता दरम्यान मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, ससूनचे डॉ.अजय तावरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातेय.

तिघांच्या भूमिका निश्चित करण्यासाठी तपास
दरम्यान, पोलिसांच्या तपासात पोलीस ठाणे आणि ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दोन आलिशान गाड्या असून त्यांच्याशी संबंधित तीन व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाला पकडले तेव्हा हे लोक पोलीस ठाण्यात हजर होते आणि रक्ताचे नमुने घेईपर्यंत ते थांबले होते. त्यांची ओळख आणि घटनेतील भूमिका निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *