महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – राज्यात अँटी जेन ’चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.