महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी अग्रवाल पिता-पुत्रांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. शशिकांत दत्तात्रय कातोरे असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव होतं.
सावकारी कर्जाला कंटाळून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणी दत्तात्रय साहेबराव कातोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या तपास करताना पोलिसांना या प्रकरणात सुरेंद्रकुमार अगरवाल, रामकुमार अगरवाल, विशाल अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.
त्यानंतर चंदननगर पोलिसांनी भादंवि ३०६, ५०४ आणि ५०६ नुसार सुरेंद्र अग्रवाल, बिल्डर विशाल अग्रवालवर याच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने विशाल अग्रवाल आणि त्याच्या वडिलांच्या अडचणीत आणखीच वाढ झाल्याचं बोललं जातंय.