महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुन ।। देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात पावसाने मागील २-३ दिवसांपासून चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे, नागरिकांना या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, उष्णतेपासून दिलासा मिळतो आणि आजूबाजूचे वातावरण आल्हाददायक बनते.
परंतु, या वातावरणात संसर्ग आणि विविध प्रकारच्या आजारांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे, या काळात सर्दी, खोकला, घसा खवखवणे, विषाणूजन्य ताप, जुलाब, मलेरिया आणि अतिसार सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. खास करून लहान मुले आणि वयोवृद्धांची या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारकशक्ती ही अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.
तुमचे घर स्वच्छ ठेवा
संसर्ग पसरवणाऱ्या अनेक प्रकारच्या विषाणूंपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे, संक्रमण टाळण्यासाठी पावसाळ्यात घर अवश्य स्वच्छ ठेवा. तसेच, घरामध्ये बुरशी किंवा बुरशीजन्य गोष्टी साचू देऊ नका. घरात खेळती हवा आणि प्रकाश राहील याची काळजी घ्या.
संतुलित आहार घ्या
विविध प्रकारच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऊर्जा वाढवण्यासाठी सकस आहार घ्या. निरोगी अन्नाचे सेवन केल्याने शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे, पावसाळ्यात तुमच्या आहारात भरपूर फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
लसीकरण अवश्य करा
पावसाळ्यात फ्लू, न्यमोनिया आणि टायफॉईडसारखे सामान्य विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही लसीकरण करू शकता. लहान मुले आणि वृद्धांचे देखील अवश्य लसीकरण करून घ्या. यामुळे, विविध प्रकारच्या आजारांचा संसर्ग टाळता येतो आणि तुमचे आरोग्य निरोगी राहते.
घराच्या आसपास पाणी जमा होऊ देऊ नका
पावसाळ्यात घराच्या आसपास पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची पैदास होण्याचा धोका असतो. त्यामुळे, अशावेळी पावसाळ्यात घरामध्ये किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.