Manoj jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली ; आज उपोषणाचा चौथा दिवस; उपचार घेण्यास दिला नकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे. मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?
“इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे त्यांना माया असते तर दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे, असे दिसते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

तसेच “डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. परंतु मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिला. यावेळी बोलताना त्यांनी तू थोडं थांब तुला कळेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनाही थेट इशारा दिला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर आठ जूनपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत. त्यांच्या या उपोषणाला गावातील लोकांनीच विरोध केल्याचे समोर आले होते. ज्यानंतर त्यांनी दुसरीकडे उपोषण करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी अंतरवालीमध्येच उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *