✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मार्च २०२६ ।। America Attack On Strait of Hormuz : जगाच्या अर्थकारणाची धडकन असलेली Strait of Hormuz सामुद्रधुनी आज अक्षरशः धुराने भरली आहे. United States, Israel आणि Iran यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता उघड युद्धाचं रूप घेतलं आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या हल्ल्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. होर्मुझमधील तणावामुळे कच्च्या तेलाची वाहतूक विस्कळीत होत असून, त्याचा फटका थेट जगभरातील अर्थव्यवस्थांना बसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलपासून महागाईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर याचे परिणाम उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असं असतानाच आता होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या गुप्त क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेने मोठा बॉम्ब हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर ५,००० पाउंड वजनाचे शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब डागले आहेत. या संदर्भातील माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या लष्कराने काय म्हटलं?
“अमेरिकेच्या सैन्याने काही तासांपूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या किनारपट्टीवरील अनेक मजबूत इराणी क्षेपणास्त्र तळांवर तब्बल ५,००० पाउंड वजनाचे शक्तिशाली ‘डीप पेनिट्रेटर’ बॉम्ब डागले आहेत. या तळांवरील इराणी जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रांमुळे सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जहाजांना धोका निर्माण झाला होता”, असं अमेरिकेच्या लष्कराने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘बंकर-बस्टर बॉम्ब’ काय आहे? हा बॉम्ब किती शक्तिशाली?
GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर म्हणजेच बंकर बस्टर बॉम्बची रचना बोईंगने केलेली आहे. अमेरिकन हवाई दलाने हा बॉम्ब तयार केलेला असून हा बॉम्ब अमेरिकन हवाई दलाकडे असणारा सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब असल्याचं म्हटलं जातं. जीपीएसचा वापर करून हा बॉम्ब लक्ष्यावर अचूक मारा करतो. हा बॉम्ब जमिनीखाली खोलवर शत्रूच्या बंकरवर मारा करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. बॉम्ब डिझाइन करण्याचं काम २००० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झालं होतं.
बॉम्बची तांत्रिक वैशिष्ट्ये काय?
GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटरचं वजन सुमारे १४,००० किलो म्हणजेच हे वजन सुमारे दोन आफ्रिकन हत्ती इतके असल्याचा अंदाज आहे. या बॉम्बची लांबी सुमारे २०.५ फूट आणि त्याचा व्यास ३१.५ इंच आहे. त्यातील वॉरहेडमध्ये AFX-757 आणि PBXN-114 स्फोटकांचा समावेश आहे. त्याचं वजन सुमारे २,५०० किलोग्राम आहे. बॉम्बच्या भेदक क्षमतेबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. काहींनी असं नमूद केलं आहे की, हा बॉम्ब २०० फूट काँक्रीटला छेदू शकतो, तर काहींचं म्हणणं आहे की बॉम्ब ६० मीटर काँक्रीट तसेच ४० मीटर खडकाळ भागाला छेदू शकतो. या बॉम्बचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील स्मार्ट फ्यूज बॉम्बचा लगेच स्फोट होत नाही. जमिनीखाली शिरल्यानंतरच या बॉम्बचा स्फोट होतो.
