FM Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला पदभार; नवीन अर्थसंकल्प ‘या’ दिवशी सादर करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। Finance Minister Nirmala Sitharaman: 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा महत्त्वाच्या अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. नव्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रालय वाटप झाल्यानंतर त्यांनी आज बुधवारी पदभार स्वीकारला. यानंतर, पुढील महिन्यात त्या 2024-25 साठी पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे.

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री
निर्मला सीतारामन या स्वतंत्र भारतातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. 2019 मध्ये त्यांनी भारतीय संसदेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन या वर्षी जुलैमध्ये अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासाठी 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 1 जुलै रोजी सादर केला जाऊ शकतो.

मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले
सीतारामन यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची राजकीय कारकीर्द 2006 मध्ये सुरू झाली. 2010 मध्ये त्यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांचा कनिष्ठ मंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.

सीतारामन यांनी मोदींच्या कार्यकाळात उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. 2019 मध्ये निर्मला सीतारामन यांना प्रथमच अर्थमंत्री बनवण्यात आले आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी 5 जुलै 2019 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला.

जुलैमध्ये सातवा अर्थसंकल्प सादर करणार
अर्थमंत्री म्हणून त्यांची ही दुसरी टर्म आहे. यावेळी त्या जुलैमध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी 5 पूर्ण आणि 1 अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानुसार हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प असेल. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 6 अर्थसंकल्प सादर करण्याचा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *