आषाढी एकादशी ! कोणत्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। यंदा आषाढी एकादशी १७ जुलै ला असून त्यादिवशी राज्यभरातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. अनेक प्रवासी स्वत:ची खासगी वाहने, रेल्वे, एसटी किंवा विविध दींडीसोबत चालत पंढरपूर गाठतात. मात्र या विठूभक्तांसाठी एसटी महामंडळाकडून एक आनंदाची माहिती मिळत आहे. भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी या कालावधीत पाच हजार विशेष बस सोडण्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे महामंडळाने सांगितले आहे.

चार तात्पुरती बस स्थानके
पंढरपूर यात्रेसाठी भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. या कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज), विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बसस्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

पुणे विभागाकडून पावणे तीनशे जादा बस
पुणे शहर आणि जिल्ह्यातून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाविकांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाने आषाढीच्या निमित्ताने पुणे विभागातून २७५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, रायगड आणि पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्या आहेत. १७ जुलै ला आषाढी एकादशी असून, दोन दिवस आधी बस सोडल्या जातील. आषाढी एकादशीच्या दिवशी २७५ जादा बस सोडल्या जातील. या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

फुकट्या प्रवाशांवर लगाम
पंढरपूर यात्रेनिमित्त फुकट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा अधिकारी २४ तास नजर ठेवून असणार आहेत. त्याचप्रमाणे विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी पोलिसांच्या सहाय्याने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *