महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुन ।। टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 26 व्या सामन्यात वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने रदरफोर्डच्या शानदार खेळीमुळे 149 धावा केल्या. याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा हा सलग तिसरा विजय आहे. यासह त्याचे 6 गुण झाले आहेत आणि तो टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानंतर ही फेरी गाठणारा तो तिसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव आहे. यामुळे टी-20 वर्ल्ड कपची पुढील फेरी गाठण्याची त्यांची शक्यता कमी दिसत आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ 6.3 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पोहोचला होता. यावेळी धावसंख्या केवळ 30 धावांवर होती.
अशा परिस्थितीत फिनिशर रदरफोर्डने जबाबदारी घेतली. त्याला समोरून फारशी साथ मिळाली नसली तरी एका टोकाकडून शामदार फलंदाजी केली. रदरफोर्डने अवघ्या 39 चेंडूत 68 धावा करत वेस्ट इंडिजची धावसंख्या 149 धावांपर्यंत नेली.