महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। पिंपरी- चिंचवड: राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा जेणेकरून त्या- त्या मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रभाव पाडता येईल. मंत्री पदासाठी स्वतः आशावादी असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते तातडीने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.
अण्णा बनसोडे म्हणाले, मुंबईला बोलावण्याचा निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्री मंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टीने मंत्री मंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या- त्या मतदारसंघात प्रभाव पडेल.
पुढे ते म्हणाले, मंत्री पदासाठी मी नेहमीच आशावादी आहे. मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांना मंत्री पद मिळेल का? हे पहावं लागेल.