टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपच्या सल्ल्यानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधान, NSE ने केलं सतर्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। National Stock Exchange: शेअर बाजारात दिवसेंदिवस गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज अनेकजण या क्षेत्रात येतात आणि पैशांची गुंतवणूक करतात. सुरुवातीला पैसे कसे गुंतवायचे हे माहिती नसल्यामुळे अनेकजण या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतात. मात्र कधीकधी अशा नवख्या लोकांची मोठी फसवणूक होते. चुकीच्या व्यक्तीकडून मिळालेल्या सल्ल्यांमुळे अनेकांचे कोट्यवधी रुपये बुडतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. याविषयी आता शेअर बाजारातील फसवणूक रोखण्यासाठी राष्ट्रीय शेअऱ बाजाराने गुंतवणूकदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर ग्रुपवर मिलणाऱ्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवू नये, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने सांगितले आहे.

एनएसईने गुंतवणूकदारांना दिला महत्त्वाचा सल्ला
एनएसईने गुतवणूकदारांना डब्बा ट्रेडिंग किंवा अवैध ट्रेडिंगविषयी सतर्क केले आहे. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर असे अनेक ग्रुप आहेत, जे गुंतवणुकीचा सल्ला देतात. तसेच अमूक कंपनीत गुंतवणूक केल्यामुळे अमूक फायदा झाला, असा दावादेखील या ग्रुपवर केला जातो. यासंदर्भाताच एनएसईने गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे. अशा प्रकारे मिळणाऱ्या सल्ल्यांपासून दूर राहा. या सल्ल्यांची अंमलबजावणी करू नका, असे एनएसईने म्हटले आहे. एनएसईने इन्स्टाग्रावरील बीएसई एनएसई लेटेस्ट (bse_nse_latest) आणि टेलिग्राम वर भारत टार्डिंग यात्रा (BHARAT TARDING YATRA) या ग्रुप्सबाबत लोकांना सतर्क केले आहे. या चॅनल्सकडून सिक्योरिटिज मार्केटवर ट्रेडिंगचा आणि ट्रेडिंग अकाऊंट मॅनेजमेंटचा सल्ला दिला जातो.

गॅरंटिड रिटर्न्स देणाऱ्याचा दावा करणाऱ्यांपासून राहा दूर
राष्ट्रीय शेअर बाजाराने परताव्याची हमी देण्याचा दावा करणाऱ्यांपासून दूर राहावे, असेही गुंतवणूकदारांना सांगितले आहे. तसेच गुंतवणूकदारांनी आपला पासवर्ड आणि यूजर आयडी कोणालाही देऊ नये, कोणाशीही तो शेअर करू नये, असाही सल्ला एनएसईने दिला आहे. एनएसईकडून वेळोवेळी अवैधरित्या ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांच्या मोबाईल क्रमांकाविषयीही माहिती दिली जाते.

नोंदणीकृत सदस्यांची माहिती कशी मिळवायची?
गुंतवणुकीचा सल्ला देणारी व्यक्ती, संस्था कोण आहे हे सामान्य गुंतवणूकदारांना माहिती नसते. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर या सल्लागारांची माहिती मिळू शकते. त्यासाठी www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिकंवर जाऊन रजिस्टर्ड मेंबर्सची माहिती मिळवता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *