महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यंदाच्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर तडकाफडकी ट्रेंट बोल्टने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ट्रेंट बोल्टने १३ वर्षे न्यूझीलंडचा सलामीचा वेगवान गोलंदाज म्हणून मैदान गाजवले. पहिल्या षटकाचा राजा आणि फलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदं त्याला मिळाली. मात्र टी२० विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती स्वीकारली. पापुआ न्यू गिनी विरूद्धचा सामना हा त्याचा शेवटचा सामना होता.
निवृत्तीबाबत सांगताना बोल्टच्या मनात संमिश्र भावना होत्या. तो म्हणाला, “निवृत्त होण्याची जाणीव थोडीशी विचित्र असते. गेल्या दोन दिवसापासून मला अस्वस्थ वाटत आहे. माझा आजचा सामना हा न्यूझीलंडसोबतचा शेवटचा सामना होता. मला यापेक्षा जास्त काय बोलावं हे काहीच सुचत नाही. आता माझी तशी मनस्थितीही नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो की मी शेवटच्या वेळी मैदानात जे काही खेळलो ते मी खूप एन्जॉय केलं.”
ऑगस्ट २०२२ मध्ये ट्रेंट बोल्टला न्यूझीलंडच्या वार्षिक करारातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याला संघात निवडण्याबाबच सातत्य दिसून आले नाही. बरेच वेळा तो संघाबाहेरही राहिला. त्यामुळेच तो विविध देशामध्ये भरपूर टी२० लीग स्पर्धा खेळला आणि त्यात त्याने आपली छाप उमटवली. गेल्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती.
ट्रेंट बोल्टने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत ७८ कसोटींमध्ये ३१७ बळी घेतले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या न्यूझीलंड गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या शेवटच्या टी२० सामन्यात सोमवारी पापुआ न्यू गिनी विरूद्ध ट्रेंट बोल्टने १४ धावा देत दोन बळी घेतले आणि सामना जिंकून मग संघाचा निरोप घेतला.
IPL खेळणार की नाही?
ट्रेंट बोल्टने आपल्या भाषणात बोलताना, ‘हा माझा न्यूझीलंडसोबतचा शेवटचा सामना होता’ असे म्हटले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही हे स्पष्ट झाले. पण याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो की, बोल्ट यापुढे टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे. तसे असल्यास तो IPL मध्येही नक्कीच खेळताना दिसू शकतो.