महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या मते ७६ वर्षीय छगन भुजबळ हे नाराज असून अनेक पर्यायांचा विचार करत आहेत. दोन पर्यायांपैकी एक पर्याय ते स्वीकारतील असं दिसतं आहे. त्यातला पहिला पर्याय स्वतःचा पक्ष स्थापन करणार किंवा दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार. असं घडलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वर्तुळ पूर्ण होईल. कारण साधारण तीन दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिलं बंड शिवसेनेतच केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते.
लोकसभेची जागा नाकारल्याने नाराजी
छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचं हे म्हणणं आहे की नाशिकमधून लोकभेचं तिकिट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज होतेच. मात्र आपल्याला राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती. पण सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखी वाढली आहे. समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली त्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे असं समजतं आहे.
भुजबळांकडे बरेच पर्याय
छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी हे सांगितलं आहे की छगन भुजबळांकडे अनेक पर्याय आहेत. त्यांचा सारासार विचार करुन ते निर्णय घेतील. समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
आणखी एका नेत्याने काय सांगितलं आहे?
आणखी एका नेत्याने सांगितलं की ओबीसी कोट्याबाबत छगन भुजबळ यांची भूमिका ठाम आहे. तसंच लोकसभेचे निकाल आले आहेत त्यानंतर छगन भुजबळांना त्यांचं भवितव्य अंधारात दिसतं आहे. महायुतीने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असं म्हटलं होतं. मात्र त्यांचं नावच जाहीर केलं नाही. शेवटी छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यानंतर त्यांनी अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाला वेठीस धरलं नाही. महा विकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला हे आता जवळपास सगळ्यांना माहीत आहे. एवढंच नाही तर जे मताधिक्य शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळालं त्याबद्दल भुजबळ यांनी दोघांचं उघड कौतुकही केलं होतं. असंही या नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं.