महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। भाजपची महाराष्ट्रातील कामगिरी एकट्या देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी नसून प्रत्येक नेत्याने जबाबदारीने काम करावे, असा आदेश देत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी विधानसभा निवडणूक रणनीती ठरविण्यासंदर्भात त्वरित चर्चा सुरू करा, असे केंद्रातील भाजप नेत्यांनी नमूद केले आहे.
भाजपचे राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव या बैठकीला उपस्थित राहतील. कोणतेही राज्य ही एका नेत्याची जबाबदारी नसते, असे सांगत फडणवीस यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. मात्र त्यांनी आता सर्वांना समवेत घेऊन विधानसभेची रणनीती तयार करावी, असेही सांगण्यात आले. एकट्याची जबाबदारी नव्हती तरी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली ही चांगली बाब आहे असे श्रेष्ठींचे मत आहे. मात्र आता विधानसभेत महायुतीला जिंकवून देण्याची जबाबदारीही त्यांनी ताकदीनिशी उचलावी, असेही सांगण्यात आले आहे.
घटकपक्षांना किती जागा मिळणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांशी चर्चा करीत घटक पक्षांना किती जागा देणे उचित ठरेल याची आखणीही करा, असेही या बैठकीत सांगण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्रात कुठे काय चुकले याचा विचार करण्याऐवजी आता पुढे काय हे ठरवा अन् ते नियोजन वेगाने प्रत्यक्षात उतरवा, अशा सूचनाही पक्षाच्या राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. सुमारे ८० विधानसभा मतदारसंघांत भाजप निवडणूक जिंकू शकतो. मात्र अन्य मतदारसंघांत काय करता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे.
अजित पवार गटाबद्दल नकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली असली तरी त्यांच्या समवेत असलेल्या किमान २० आमदारांच्या मतदारसंघांत भाजपचे फारसे काम नाही. त्यामुळे, या गटाला तसेच शिंदे गटालाही समवेत ठेवले जाणार हे सांगण्यात आले.
भविष्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही निर्णयप्रक्रियेत मोठे योगदान देतील, असे समजते. केंद्राने तशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जागावाटप, उमेदवारनिश्चिती होणार वेगाने!
लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यास वेळ लागल्याने महायुतीला मोठा फटका बसला. आता ती चूक टाळण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान जागांवरील प्रत्येकाची ताकद लक्षात घेत समीकरणे निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते.