NEET row | लीक झालेला NEET पेपर परीक्षेचाच, अटकेतील उमेदवाराची कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। नीट पेपर लीक प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. नीट (NEET) परीक्षेच्या निकालातील घोळ आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला उमेदवार अनुराग यादव याने परीक्षेचा पेपर फुटल्याची कबुली दिली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

बिहारमधील दानापूर नगरपरिषद (दानापूर नगर परिषद) येथे नियुक्त असलेल्या अभियंत्याचा पुतण्या २२ वर्षीय अनुराग यादवने सांगितले की, त्याचा नातेवाईक सिकंदर प्रसाद यादवेंदु याने त्याला परीक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचे म्हटले होते. त्याला उत्तरांसह NEET परीक्षेची लीक झालेली प्रश्नपत्रिकाही देण्यात आली होती, अशी कबुली यादव याने दिली आहे.

जेव्हा तो परीक्षेला बसला आणि त्याला खरी प्रश्नपत्रिका देण्यात आली. तेव्हा ती त्याच्या काकांनी दिलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळली, असा खुलासा त्याने पुढे केला.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटकडून पाटणा येथील NEET परीक्षेच्या आयोजनातील कथित अनियमिततेबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

देशभरात निदर्शने
बिहारमध्ये नीट प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत. या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत.

नीट परीक्षेत ०.००१ टक्के जरी हयगय झाली असेल, तर त्याची चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) गेल्या मंगळवारी दिले होते. कथित पेपरफुटी आणि गैरप्रकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीसही बजावली होती.
नीट यूजी (NEET UG) परीक्षा ५ मे रोजी ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. या सुमारे २४ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आधी पूर्ण झाल्यामुळे निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *