महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। आषाढी वारी सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या वर्षी पंढरपुर येथे १७ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा आहे.
यादरम्यान अन्न व औषध प्रशासन (FDA)देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या आषाढी वारी मार्गावर कडक अन्न तपासणी उपाययोजना राबवेल.
यासाठी पाण्याच्या बाटल्या, प्रसाद आणि तळलेले खाद्यपदार्थ यांची तपासणी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करून FDA नोडल प्राधिकरण म्हणून काम करेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले आहे.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी २५ जूनला प्रस्थान होणार आहे. भाविकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एफडीए सज्ज आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला पोहोचेपर्यंत सात ते आठ अधिकारी त्यांना मदत करतील. पालखी पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातून जाते. या भागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दिंडी आणि पालखीतील वारकऱ्यांना विविध ठिकाणी हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वयंसेवी संस्था आणि अन्नदान गटांद्वारे खाद्यपदार्थ पुरवले जातात. एफडीएने वारी मार्गावरील सर्व दुकाने, हातगाडी विक्रेते आणि हॉटेल्सची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, या अन्न पुरवठादारांमध्ये जनजागृती करून अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करेल.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि औषधांची होणार तपासणी
नोंदणी नसलेल्या स्ट्रीट फूड दुकांनांना नोंदणी किंवा परवानगी घेणे आवश्यक आहे.
पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मानकांचे पालन करण्यासाठी पाण्याच्या बाटलीची लेबले तपासली जातील.
तळलेल्या खाद्यपदार्थाची साइटवर TPC मीटर वापरून तपासणी केली जाईल.
दक्षता हे सुनिश्चित करेल की कालबाह्य झालेले अन्न विकले किंवा वितरित केले जाणार नाही, अयोग्य अन्नपदार्थ नष्ट केले जातील.
प्रत्येक मिठाई विक्रेत्याची ‘Use By Date’ स्पष्टपणे चिन्हांकित असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी केली जाईल.
जेवण देताना कागदाचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वच्छता आणि नियमांचे पालन याबाबत व्यापाऱ्यांना परिपत्रके वितरित करण्यात येणार आहेत.
औषधांचीही केली जाणार तपासणी
ड्रग इन्स्पेक्टर पालखी मार्गावर औषध विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करतील. देखरेखीमुळे भाविकांना वाजवी किमतीत औषधे विकली जातील याची खात्री होईल. मुदत संपलेल्या औषधांची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात येईल.
अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द
पालखी प्रस्थान सोहळा पुणे जिल्ह्यात होतो. त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर अधिकारी व कर्मचारी तपासणीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. 25 जून ते 17 जुलै या कालावधीत या विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याला रजा घेता येणार नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणालाही रजा देऊ नये, अशा सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.