Sujay Vikhe Patil Video: सुजय विखेंकडून फेर मतमोजणीची मागणी; निवडणूक आयोगाकडे भरले १८ लाख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये (Nagar South Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे -पाटील यांचा पराभव केला. मात्र या मतदारसंघातील निकालावर सुजय विखे-पाटील यांनी शंका व्यक्त करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे आता नीलेश लंके यांचे टेन्शन वाढणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ‘ईव्हीएमवर (EVM) शंका नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर फेर मतमोजणीची मागणी केली.’

नगर दक्षिण लोकसभा निकालाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. लोकसभा मतदार संघातील ४० मायक्रो कंट्रोल युनिट आणि VVPAT ची फेर मोजणी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे ठरलेलं शुल्क भरून ही मागणी केली आहे.

नगर शहर ५, राहुरी मतदारसंघ ५, शेवगाव पाथर्डी ५, कर्जत जामखेड ५ तर पारनेर आणि श्रीगोंदा मतदार संघातील १० इव्हीएम मशीनचा यामध्ये समावेश आहे. ४० बूथवरील मायक्रो कंट्रोल युनिट आणि VVPAT ची फेर मतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. १८ लाख ८८ हजार शुल्क भरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे. अनेक गावातील कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही मागणी केली असल्याची माहिती सुजय विखे यांनी दिली. ईव्हीएमवर शंका नाही मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मागणी केल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या या मागणीवर नीलेश लंके यांनी टोला लगावला आहे. ‘आता तरी पराभव मान्य करा. सत्तेतील माणसं निवडणूक आयोगावर आक्षेत घेत असेल तर ही चुकीची बाब आहे.’, असा निशाणा नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर साधला. ‘तुम्हाला पराभव मान्यच होत नसल्याने ही चुकीची बाब आहे. शेवट राजकारणामध्ये पराभव देखील मान्य करायला शिकलं पाहिजे. अनेक निवडणुकांमध्ये आक्षेप घेतला गेला मात्र नंतर एकही मताचा फरक पडत नाही. त्यामुळे पराभव झाला असल्याच आतातरी मान्य करा.’ अशी टीका लंके यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *