पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : हायकोर्टाने निर्णय ठेवला राखून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुन ।। देशभरात खळबळ उडवून देणार्‍या पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्‍पवयीन आरोपीच्‍या मुक्‍ततेसाठी दाखल याचिकेवर आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. दोन्‍ही बाजूंच्‍या युक्‍तीवादानंतर न्‍यायालयाने मंगळवार, २५ जूनपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २५ जून रोजी होईल, असे वृत्त ANI ने दिले आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणातील संशयित आरोपीच्‍या सुटकेसाठी त्‍याच्‍या नातेवाईकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज झालेल्‍या सुनावणीवेळी उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, या अपघातात ठार झालेल्‍या तरुण आणि तरुणीच्‍या कुटुंबीयांना धक्‍का बसला आहे. तसेच दारूच्या नशेत हा अपघात घडवणारा अल्पवयीन युवकही मानसिक धक्‍क्‍यात आहे. या घटनेचा परिणाम त्‍याच्‍या मनावर झाला असेल, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायालयाने दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ जून रोजी होणार आहे.

पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने तो दारू पीत असल्याचे मान्य केले आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे मुलगा दारु पित असल्‍याचे त्‍याच्‍या वडिलांना माहित हाेते. तरीही त्‍यांनी त्‍याला अलिशान पोर्शे कार चालविण्‍यास दिली असल्‍याचे पाेलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवार, १९ मे रोजी पुण्यातील दोन आयटी इंजिनिअरला चिरडले होते.

अल्‍पवयीन चालकासह वडिलांसह पाच जणांवर गुन्हा
पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील, ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह हॉटेल मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेलचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल याला २१ मे रोजी अटकही करण्‍यात आली आहे.

‘त्‍या’ मुलाने पबमध्ये ९० मिनिटांत खर्च केले ४८ हजार रुपये!
पुण्यातील पोर्शे कार अपघातात दाेन जणांचा दुर्देवी मृत्‍यू झाल्‍याच्या घटणेत पोलिसांकडून एक खुलासा समोर आला आहे. या घटनेतील आरोपी अल्‍पवयीन मुलाने त्‍याच्या वेगवान पोर्शे कारने दोघांना उडवायच्या आधी एका पबमध्ये पार्टी केली होती. या अपघाताच्या आधी त्‍याने एका पबमध्ये तब्‍बल ४८,००० रूपये खर्च केले होते. पोलिसांनी दावा केला आहे की, त्‍या मुलाने अपघाताच्यावेळी दारू प्राशन केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *