महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) संततधार पावसात डोंगरउतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे काँक्रिटीकरणालगत केलेल्या भरावासह संरक्षण भिंत कोसळली आहे. तसेच येथील काँक्रिटीकरणालादेखील तडे गेले आहेत. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, खेड व चिपळूणचे प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या (National Highways Department) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत एक मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने या ठिकाणाची पाहणी केली.
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी अतिवृष्टीत दरडी कोसळण्याचा धोका संभवत आहे. या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील एका अवघड वळणावर पेढेच्या खालच्या बाजूला रस्त्यालगतचा भराव खचून झाडेदेखील उन्मळून पडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.
याबरोबरच येथील काँक्रिटीकरणालादेखील तडे गेले आहेत. यामुळे पेढे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घाटाच्या खालच्या बाजूला वस्ती असल्याने, तेथील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक एकाच मार्गावरून वळवण्यात आली तर खचलेल्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय तेथे यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाट त्रासदायक ठरला आहे. येथील दरड कोसळण्याचा प्रकार डोकेदुखी बनली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी घाटातील अडचणी मात्र कमी होताना दिसत नाहीत. पावसाळ्यात येथे कोणताही धोका उद्भवू नये, पायथ्याशी असलेल्या पेढे गावालादेखील संरक्षण मिळावे व येथील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी येथे सुमारे २०० मीटरची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती; परंतु गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून मातीचा भरावही खाली आला. तसेच येथील सर्व्हिस रोडला देखील तडे गेले. या घटनेमुळे येथील कामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
परशुराम घाटात पाहणीसाठी जात आहोत. त्याआधी आमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे. ज्या ठिकाणी संरक्षण भिंत कोसळली आहे, तेथे नव्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. तडे गेलेले काँक्रिटीकरण काढून पुन्हा नव्याने ते केले जाणार आहे.
-पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण विभाग