पुणे नाशिक महामार्गावर आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुन ।। पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चांनादेखील उधाण आलं आहे.

शनिवारी रात्री पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तर एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते पाटील असं आमदार दिलीप मोहिते पाटल यांच्या पुतण्याचं नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळी अपघात झाला, त्यावेळी चालकाने मद्य प्राशन केले होतं का? याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या अपघातानंतर आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यासंदर्भात टीव्ही ९ वृत्तावाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात रात्रीच्या अंधारात झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची कुठलीही कल्पना मला नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी माझा पुतण्याने मद्यप्राशन केलेलं नव्हतं आणि हा अपघात झाल्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *