चिंताजनक ; पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुन ।। पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका डॉक्टराला आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोघांवरही सध्या उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवरही विशेष लक्ष ठेवलं जात आहे. सध्या तरी त्यांच्यामध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. शहरात यंदाच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोणाला झाला संसर्ग अन् कसं समोर आलं हे?
एरंडवणा येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा 46 वर्षीय डॉक्टर असून त्याच्या माध्यमातून त्याच्या 15 वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली. स्वत: डॉक्टर असल्याने या व्यक्तीने स्वत:च्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी 18 जून रोजी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवलेला. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल 20 जूनला मिळाला. यानंतर या डॉक्टरच्या मुलीमध्येही झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली. तिच्या रक्ताचा नमुना 21 जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवला गेला. या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचेही स्पष्ट झालं. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली आहे. दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अद्याप तरी झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.

यंत्रणेला आली जाग
एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. दोन रुग्ण आढळून आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या एरंडवणामध्ये औषध फवारणी सुरू केली आहे. तसेच डासोत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. तसेच एरंडवण परिसरात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना प्रथमोपचार देऊन रक्ताचे नमुने संकलित केले जात आहेत.

प्रकृती स्थिर
पुणे महानगरपालिकच्या प्रभारी आरोग्य प्रमुख कल्पना बळीवंत यांनी यासंदर्भात बोलताना, “शहरात आढळून आलेल्या झिकाच्या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली. सध्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. तसेच आता महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत,” अशी माहिती दिली.

काय काळजी घ्यावी…
– घराभोवती पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.

– शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे घालण्यास प्रधान्य द्यावे.

– दिवसाही डास प्रतिरोधक औषधांचा वापर करणं फायद्याचं ठरतं.

– झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

– गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *