![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ मार्च २०२६ ।। जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे वळलेल्या गुंतवणूकदारांनी आता नफावसुलीला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीवरील एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग मंदावला आहे. Association of Mutual Funds in India च्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२६ मध्ये गोल्ड ETFमध्ये सुमारे ५,२५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, मात्र जानेवारीमध्ये हा आकडा तब्बल २४,०३९.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे एका महिन्यात गुंतवणुकीचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.
चांदीच्या ETFमध्ये तर २७ महिन्यांनंतर प्रथमच निव्वळ निधी बाहेर पडल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात चांदीच्या ETFमध्ये ४,६२८ कोटी रुपयांचा निधी आला, परंतु त्याच कालावधीत ५,४५५ कोटी रुपयांची रिडेम्पशन झाली. त्यामुळे सुमारे ८२६ कोटी रुपयांचा निव्वळ निधी बाहेर पडला. नोव्हेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच गुंतवणुकीपेक्षा पैसे काढून घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जानेवारी महिन्यातही चांदीच्या ETFमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. फेब्रुवारीमध्ये चांदीच्या दरात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली, तर जानेवारीमध्ये ती १९ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. २०२६ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांदीच्या दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२५ मध्ये तर चांदीच्या किमतींनी तब्बल १४८ टक्क्यांची झेप घेतली होती. त्यामुळे किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार संधी साधत नफावसुली करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
