MCL Election 2024: भाजपला फडणवीस पुन्हा तारणार? आकडेवारी इंटरेस्टिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुलै ।। विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होत आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाची विकेट पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडे असलेली १४ अतिरिक्त मतं कोणाकडे वळणार त्यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. त्यामुळे काँग्रेसला विधान परिषदेत कमालीचं महत्त्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसचे ३-४ आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ जण रिंगणात आहेत. भाजपचे ५, शिंदेसेनेचे २ आणि अजित पवार गटाचे २ असे महायुतीचे ९ जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर महाविकास आघाडीकडून ३ जण रिंगणात आहेत. काँग्रेस, ठाकरेसेनकडून प्रत्येकी १ जण निवडणूक लढत आहे. तर शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील यांनी अर्ज भरला आहे. विजयासाठी उमेदवारांना २३ मतांची गरज आहे.

अवैध मतदान, फोडाफोड, दगाफटक्याचा धोका लक्षात घेता काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांच्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतं देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही पक्षाकडे १० मतं शिल्लक राहतात. ही मतं महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांना (मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील) मिळतात की फुटतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. त्यामुळे काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. तर भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड निवडून आले होते

डेंजर झोनमध्ये कोण?
परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे डेंजर झोनमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. यापैकी काहींनी क्रॉस व्होटिंग केल्यास गर्जेंचा पराभव होऊ शकतो. गर्जे हे अजित पवार गटाचे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार आहेत.

नार्वेकर, पाटील गणित जुळवणार?
ठाकरेसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढत असलेले शेकापचे जयंत पाटील यांच्याकडेही पुरेसं संख्याबळ नाही. पण नार्वेकर आणि पाटील यांचे लहानमोठ्या पक्षांमधील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. ते वैयक्तिक पातळीवर मतांची बेगमी करु शकतात

भाजपला फडणवीस पुन्हा तारणार?
भाजपकडे असलेली मतं पाहता त्यांचाही एक उमेदवार डेंजर झोनमध्ये आहे. सदाभाऊ खोत, अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पाचही उमेदवारांची मदार पक्षाकडे असलेल्या ११२ मतांवर आहे. त्यांना पहिल्या पसंतीची ३ ते ५ मतं बाहेरुन आणावी लागतील. या परिस्थितीत भाजपच्या उमेदवारांची भिस्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता नसताना, समोर तीन पक्षांचं आव्हान असताना फडणवीसांनी तब्बल २१ मतं अधिकची खेचली होती. त्यामुळे भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड दुसऱ्या फेरीत गेले आणि दुसऱ्या पसंतीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे यंदा फडणवीस कोणाचे ‘लाड’ करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *