Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेसाठी तुळजापुरात उसळणार गर्दी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर नगरीत कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा रविवारी साजरा होत आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) उत्तर रात्री 4.17 वाजता कोजागिरी पौर्णिमेस प्रारंभ होत असून, रविवारी (29 ऑक्टोबर) दुपारी 1.53 वाजता कोजागिरी पौर्णिमा समाप्त होत आहे. याशिवाय यंदा खंडग्रास चंद्रग्रहण योग चालून आल्याने ग्रहणाच्या वेधकाळात मातेची मूर्ती निद्रिस्त राहणार आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी मूर्ती सिंहासनारूढ करून ग्रहण काळात जवळपास दीड तास ती सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर मातेचे चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मातेला पंचामृत अभिषेक सुरू केले जाणार आहेत.

श्री तुळजाभवानी मातेची श्रम निद्रा रविवारच्या उत्तररात्री सहाव्या दिवशी संपल्यानंतर मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत. या अभिषेकाच्या निमित्ताने हजारो भाविकांना थेट गाभार्‍यातून दर्शन घेण्याचे सौभाग्य यंदा लाभणार आहे. त्यानंतर मातेच्या शोड्षोपचार पूजेदरम्यान भाविकांना (महावस्त्रालंकार, नैवेद्य, धुपारती, अंगारा) धर्म दर्शन व मुख दर्शन घेता येणार आहे.

देवस्थानच्या उत्पन्नात वाढ
दहा दिवसांत 11 लाख भाविकांनी मातेच्या चरणी माथा टेकला आहे. देवस्थानच्या उत्पन्नातही साडेतीन लाख रुपयांची वाढ झाली. मंदिर संस्थानचे उत्पन्न यावर्षी साडे तीन लाख रुपयांनी वाढले आहे. यंदा पेड दर्शन व्यवस्थेतून मंदिर संस्थानला तब्बल 1 कोटी 90 लाख 43 हजार 400 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सिंहासन दान पेटीतून 1 कोटी 6 लाख 1,890 रुपये प्राप्त झाले आहेत. मातेला पाऊण किलो सोने म्हणजे 736 ग्रॅम सोने आणि 11 किलो 954 ग्रॅम चांदी प्राप्त झाली आहे. सिंहासन दानपेटी 51 लाख 40 हजार, 840 रुपये, विश्वस्त निधीतून 20 लाख 28 हजार, 416 रुपये, मनिऑर्डरच्या माध्यमातून 1 लाख 85 हजार 138 रुपये, धनादेश देणगी 1 लाख 75 हजार,612 रुपये, यूपीआय ऑनलाइन देणगीतून 1 लाख, 39 हजार,236 रुपये प्राप्त झाले आहेत.

शिवाय रोख स्वरुपात 10 हजार 903 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. याखेरीज मातेच्या इतर धार्मिक पूजा विधीच्या माध्यमातून 22 हजार 641 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा येऊनही रोख व दागदागिन्यांच्या स्वरुपात सुमारे तीन कोटी सत्तर लाख रुपयांचे उत्पन्न मातेच्या तिजोरीत जमा झाले होते. यावर्षी 3 कोटी 73 लाख 48 हजार 769 रुपये उत्पन्न मिळाले आहे. वर्षाला अंदाजे 10 कोटींहून आर्थिक उत्पन्न असलेल्या तुळजा भवानी मंदिर संस्थानला यावर्षी दहा दिवसांत जवळपास निम्मे उत्पन्न प्राप्त झाल्याने येत्या पौर्णिमा काळात आणि पुढील काळात उत्पन्नात मोठी भर पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *