महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून गणपती स्पेशल विशेष गाड्या सोडण्यात येतात. रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या या गाड्यांचे पहिल्या पाच मिनीटातच बुकिंग फूल झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गणपती स्पेशल गाड्यांचे अवघ्या काही मिनिटातच बुकिंग फूल झाल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटात २५८ गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल झाले असून वेटिंग लिस्ट ७०० ते ८०० च्या घरात गेली आहे.
गणपती काळात चाकरमान्यांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे २०२ विशेष गाड्या चालवणार आहे तर पश्चिम रेल्वे कडून ५६ गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती मागणी बघता मध्य रेल्वे आणखी ५० गाड्या सोडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल झाल्याने आता खासगी बसेसचा दर कसा परवडणार? असा सवाल चाकरमान्यांकडून उपस्थित केला जात आहे. पहिल्या पाच मिनिटातच बुकिंग फुल झाल्याने गणपतीला गावी जाण्यासाठी यंदाही चाकरमान्यांची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत.