महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। देशभरात सोन्याची किंमत स्वस्त झाली आहे. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (बजेट) मध्ये कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्यानंतर सोने तब्बल ६,००० रुपयांनी घसरले. सरकारच्या या पावलांमुळे सोन्याची किंमत अचानक कमी झाल्यामुळे बरेच लोक गुंतवणुकीच्या मूडमध्ये दिसत आहेत. सोन्याच्या किंमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळतात त्यामुळे सध्याच्या घसरणीत तुम्हीपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्ष ठेवली पाहिजे.
सोने खरेदी करताना लक्षात ठेवायची बाब
बदलत्या काळात डिजिटल सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे तरीही बहुतेक लोक फिजिकल म्हणजे भौतिक सोने खरेदीला प्राधान्य देतात. देशात सोन्यात गुंतवणुकीचे बरेच पर्याय आहेत. अशा स्थितीत, बरेच लोक नकळत एक चूक करतात ज्यामुळे त्यांना भविष्यात पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे, तुम्हीपण सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर एका नक्की विचार करा.
मेकिंग चार्जेसच्या गुंडाळ्यात ग्राहक
दागिने खरेदी करताना ग्राहकांना तीन गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. पहिली म्हणजे दागिन्यांची किंमत जी वजनानुसार ठरवली जाते त्यांनतर दुसरी म्हणजे मेकिंग चार्ज आणि तिसरी जीएसटी जे ३% असते. सोन्याचे दागिने ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी केले तरी ग्राहकांना ३% जीएसटी आकारले जाते. पण तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार असाल तर आताच तुमचा निर्णय बदला.
दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. सोन्याची नाणी १ ग्रॅमपासून उपलब्ध असते. तसेच दागिन्यांपेक्षा सोन्याची नाणी भविष्यात जास्त परतावा देतात. दागिने खरेदी करताना मेकिंग चार्ज भरावा लागतो. सहसा सराफा १५ ते २० टक्के मेकींग चार्ज आकारतात तर डिझाइनर दागिन्यांमध्ये मेकींग चार्ज २५ ते ३० टक्के असू शकतो. अशा परिस्थितीत, एक लाखाच्या सोन्याच्या दागिन्यानावर १५ ते २० टक्के मेकिंग चार्ज द्यावा लागेल.
सोन्याचे दागिने खरेदीचे तोटे
बहुतेक लोक रत्नजडित दागिने खरेदी करतात ज्याचे वजनही सोन्याशी जोडलेले असते म्हणजे भविष्यात दागिने विक्रीवर रत्नाचा परतावा मिळणार नाही कारण दागिने विकताना किंवा एक्सचेंज करताना केवळ सोन्याची किंमत लक्षात घेतली जाते. अशाप्रकारे मेकिंग चार्जसाठी दिलेले संपूर्ण पैसे पाण्यात गेले. म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करताना भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा एकदा विचार करा.
तुमचा तोटा नफ्यात कसा बदलायचा
आता तुम्हाला सोने खरेदी करून घरातच ठेवायचे असेल तर सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करा ज्यावर तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही तर केवळ ३% जीएसटी आकारला जातो. म्हणजे विक्रीच्या वेळी मेकिंग चार्ज वजा करण्याची कोणतीही तडजोड तुम्हाला करावी लागणार नाही. तसेच जेव्हा तुम्ही सोन्याचे नाणे किंवा बिस्कीट विकायला जाल तेव्हा तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील, मग दागिने खरेदी करून स्वतःच नुकसान का करायचं?